मी आज फूल झाले
मी आज फूल झाले मी आज फूल झाले
जणू कालच्या कळीला लावण्यरुप आले
मी आज फूल झाले
सोन्याहुनी सतेज ही भासते सकाळ
किरणांतुनी रवी हा फेकीत इंद्रजाल
मी बावरी खुळी गं या सावलीस भ्याले
मी आज फूल झाले मी आज फूल झाले
आली कशी कळेना ओठांस आज लाली
स्पर्शुन जाय वारा शब्दांस जाग आली
फुलवून पाकळ्या मी ओल्या दवांत न्हाले
मी आज फूल झाले मी आज फूल झाले
मी पाहते मला का डोळे भरून आज
लागेल दृष्ट माझी पदरी लपेल लाज
मी आज यौवनाचा शृंगार साजल्याले
मी आज फूल झाले मी आज फूल झाले
जणू कालच्या कळीला लावण्यरुप आले
मी आज फूल झाले